लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पारंपरिक पिकांना फाटा देऊन अवघ्या १० गुंठे क्षेत्रात २५० सागवान वृक्षांची लागवड करून सुंदर असे रोपवन फुलविण्याची किमया मालेगाव तालुक्यातील शेतकरी मुरलीधर कोंगे यांनी केली आहे. त्यांचा हा प्रयोग पर्यावरणपुरक आणि इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरावा असाच आहे.जिल्ह्यातील मानोरा तालुका वगळता इतर तालुक्यांच्या तुलनेत थोडा मागास असलेल्या मालेगाव तालुक्यात शेतीत विविध प्रयोग करून भरघोस उत्पादन घेणाºया शेतकºयांची संख्या मात्र बºयापैकी आहे. या तालुक्यातील बºयाच शेतकºयांनी केवळ शेतीच्या बळावर आर्थिक विकास साधला आहे. अशा वेगळे प्रयोग करणाºया शेतकºयांत जामखेड येथील शेतकरी मुरलीधर कोंगे यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती असून, या शेतीत ते विविध पारंपरिक पिके घेतात. आता त्यांनी आपल्या शेतीपैकी १० गुंठे क्षेत्रात ९ महिन्यांपूर्वी २५० सागवान वृक्षांची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. प्रत्येक ५ चौरस फुट अंतर राखून त्यांनी सागवान वृक्षांची लागवड केली. यासाठी त्यांनी ब्रम्हा जातीच्या सागवान रोपांची निवड केली. ही झाडे जगविताना पाण्याची गरज असेल; परंतु पाण्याचा अपव्ययही होऊ नये आणि टंचाईमुळे रोपे सुकूही नयेत म्हणून त्यांनी ठिबक पद्धतीने रोपांना पाणी दिले. त्यामुळे रोपांना मोठा फायदा झाला आणि त्यांची झपाट्याने वाढ झाली. सद्यस्थितीत ही झाडे ९ ते १० फुट उंच झाली असून, हिरवीगार असल्याने मन मोहून घेत आहेत. ही झाडे लावल्यानंतर झाडांखालील जमीन मोकळी आणि हवा खेळती राहणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी घरच्या महिलांचे सहकार्य घेऊन स्वत: निंदण केले, डवरणी केली. रासायनिक खतांचा वापर टाळला. त्याचा मोठा फायदा वृक्षवाढीसाठी झाला. एक कोटी उत्पन्नाचा विश्वासमुरलीधर कोंगे यांनी त्यांच्या शेतात लावलेल्या सागवान वृक्षांचा पर्यावरणाला फायदा होणार आहेच शिवाय या झाडांपासून त्यांना भरघोस उत्पन्नही मिळणार आहे. सद्यस्थितीत १० महिन्यांची झालेली ही झाडे १० वर्षे जगवून त्यांची योग्यपद्धतीने निगा राखल्यास मुरलीधर कोंगे यांना तब्बल १ कोटीचे उत्पन्न होण्याचा विश्वास आहे. अर्थात केवळ १० गुंठे क्षेत्रात प्रतिवर्षी १० लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळू शकणार आहे. त्यासाठी ते शास्त्रोक्त पद्धतीने झाडांना पाणी देणे, सेंद्रीय खतांचा वापर करण्यावर अधिकाधिक भर देत आहेत. पाटबंधारे विभागाकडून सत्कारपारंपरिक शेतीला फाटा देत १० गुंठे शेतात सागवान वृक्षांची लागवड करणारे आणि वनशेतीला प्राधान्य देणारे मुरलीधर कोंगे यांच्या कार्याची दखल प्रशासनाने घेतली आहे. त्यांनी लागवड केलेल्या २५० सागवान वृक्षांची पाहणी करून जलसाक्षरात अभियान आणि पाटबंधारे विभागाच्यावतीने त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे. लदूत रविंद्र इंगोले यांनी त्यांच्या शेतात जाऊन त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
दहा गुंठे क्षेत्रात फुलविले अडिचशे सागवानांचे वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 4:48 PM