जिल्ह्यात १ फेब्रुवारीपर्यंत कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ७,१५४ होता. तो ३० मार्चअखेर दुपटीपेक्षा अधिक वेगाने वाढून १५,८६७ वर पोहोचला आहे. १३ हजार ५८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला, तर २६२१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यापैकी साधारण ५०० रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले असून, तर उर्वरित रुग्णांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे.
..................
एकूण कोरोना रुग्ण - १५,८६७
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - २,६२१
गृहविलगीकरणातील रुग्ण - २,१००
एकूण कोरोनाबळी - १८७
.......................
दररोज ३०० पॉझिटिव्ह, चाचण्या मात्र हजार लोकांच्याच
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन ३०० पेक्षा अधिकच कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. या बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या किमान पाच लोकांची तरी कोरोना चाचणी व्हायला हवी. याप्रमाणे दररोज १५०० पेक्षा अधिक कोरोना चाचण्या होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र दैनंदिन ९०० ते १००० चाचण्या सध्या केल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...................
कोट :
१५ दिवसांपूर्वी माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. हे कळताच मी संस्थात्मक विलगीकरणात उपचार घेण्याची मागणी आरोग्य विभागाकडे केली. त्यानुसार उपचारही घेतले; परंतु माझ्या संपर्कातील व्यक्तींबाबत कुठलीही माहिती कोणी जाणून घेतलेली नाही. मी ज्या खासगी कार्यालयात काम करतो, तेथीलही कोणाची कोरोना चाचणी करण्यात आलेली नाही.
बाधित रुग्ण, नवीन आययूडीपी कॉलनी, वाशिम
..................
कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. आता कुटुंबातील सदस्यांसोबतच मी ज्यांच्या संपर्कात आलो, त्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, अशी धास्ती होती. प्रत्यक्षात मात्र आरोग्य विभागाने विचारपूसही केली नाही. संपर्कातील व्यक्तींची चाचणीदेखील करण्यात आली नाही.
बाधित रुग्ण, शुक्रवारपेठ, वाशिम
................
कोट :
पूर्वी कोरोनाबाधित आढळणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कातील किमान २० ते २५ लोकांची कोरोना चाचणी करून घेतली जात असे. गेल्या काही दिवसांपासून मात्र ‘हाय रिस्क’ असलेल्या बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचीच चाचणी केली जाते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला चाचणी करून घेणे आजही बंधनकारक आहे.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम