मानोरा (माणिक डेरे ) : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर, राज्यातील बंजारा वोट बॅंक शाबूत ठेवण्याचा प्रयत्न म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी १७ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा धर्मगुरू संत बाबुसिंग महाराज यांच्यासह संत-महंतांची भेट घेत चर्चा केली. बंजारा संत, महंतांची भेट घेण्यासाठी पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच पोहरादेवीत येण्याचे संकेत या भेटीतून मिळाले आहेत.
महाविकास आघाडीच्या पतनानंतर नुकत्याच शिंदेसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघातील निष्ठावान मतदार आणि पदाधिकारी राखण्यासाठी यापुढे नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. शिंदेसेनेत गेलेल्या ना. संजय राठोड यांनी १४ ऑगस्ट रोजी पोहरादेवीत हजेरी लावून समाधीस्थळाचे दर्शन घेत संत-महंतांशी चर्चा केली होती.
१७ ऑगस्ट रोजी वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविलेले शिवसेना नेते राजू नाईक, गोंदिया विधानसभा संपर्क प्रमुख इंदल भोला राठोड, विशाल जाधव, मानोरा तालुका अध्यक्ष रवींद्र पवार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्याम राठोड, विरू राठोड, वसंत राठोड आदींनी बंजारा धर्मगुरू संत बाबुसिंग महाराज यांच्यासह संत-महंतांची भेट घेतली. मानोरा तालुक्यातील बंजारा आणि इतर धर्म व समाजाचे तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील माता जगदंबा, संत सेवालाल महाराज आणि तपस्वी संत डॉ. रामराव बापू महाराज यांच्या दर्शनासाठी लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार असल्याचे या भेटीतून संकेत मिळाले आहेत.