रिसोड (जि. वाशिम): तालुका दुष्काळग्रस्त आणि पैसेवारी ५0 पेक्षा कमी असतानाही रिसोड तालुक्यातील चार महसूल मंडळांना पीक विमा योजनेतून वगळण्यात आले आहे. या पृष्ठभूमीवर रिसोड पंचायत समितीच्या पदाधिकार्यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशी चर्चा करून चार मंडळांच्या पीक विमा योजनेत समावेश करावा, अशी मागणी केली. रिसोड तालुक्यातील चार मंडळांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेऊन पंचायत समिती उपसभापती महादेव ठाकरे व अन्य पदाधिकार्यांनी रिसोड तालुक्यातील चार मंडळांना पीक विम्याच्या लाभातून वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. रिसोड तालुक्यात आठ मंडळ असून त्यापैकी भर जहागीर, वाकद, केनवड व गोवर्धन या चार मंडळांना पीक विम्यातून वगळण्यात आले आहे. ज्या मंडळामध्ये पीक विमा मंजूर करण्यात आला, तोसुद्धा तुटपुंजा असल्याची बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली. वगळण्यात आलेल्या चार महसूल मंडळात बराच भाग डोंगराळ व दुर्गम म्हणून ओळखला जातो. या सर्व मंडळातील पैसेवारी ५0 पेक्षा कमी आहे. येथे दुष्काळी परिस्थिती असतानादेखील पीक विम्यापासून या मंडळातील शेतकर्यांना वंचित ठेवले असल्याचा आरोप पदाधिकार्यांनी केला. वगळण्यात आलेल्या चार मंडळाला तातडीने पीक विम्याचा लाभ मंजूर करावा आणि दोषी अधिकार्यांविरुद्ध कारवाई करावी, रिसोड तालुका दुष्काळग्रस्त असल्याने शासनाने शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत करावी, अशी मागणी उपसभापती महादेव ठाकरे, पंचायत समिती सदस्य बंडू घुगे, कावेरी अवचार, अशोक नरवाडे आदींनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली. यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन डॉ. पाटील यांनी दिले.
चार मंडळांना पीक विम्याचा लाभच नाही!
By admin | Published: June 20, 2016 2:07 AM