लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : माहेरच्या लोकांना मारझोड करून बायकोला जबरदस्तीने सोबत घेवून जाण्याच्या प्रयत्नात सैन्यदलात कार्यरत सुधाकर नवघरे याने स्वत:च्या सासूची कुकरी नावाच्या शस्त्राने हत्या केली. २१ मार्च २०१४ रोजी वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे घडलेल्या या घटनेचा निकाल शुक्रवार, २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. त्यात विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही. जटाळे यांनी सुधाकर नवघरे याच्यासह चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अनसिंग येथील काजोल लक्ष्मण कालापाड हिचे लग्न १८ डिसेंबर २०१२ रोजी सैन्यदलात कार्यरत सुधाकर विश्वास नवघरे याच्यासोबत झाले. लग्नाच्या वेळी काजोल ही दहाव्या वर्गाला शिक्षण घेत होती. त्यासाठी ती माहेरीच वास्तव्याला असायची. यादरम्यान मार्च २०१४ या महिन्यात काकाच्या मुलाच्या लग्नानिमित्त सुधाकर हा सुटी घेवून घरी आला असता, त्याने आपले आई-वडिल व भावाला सोबत घेवून बायकोचे माहेर गाठले व काजोलला सोबत पाठविण्याचा तगादा लावला. मात्र, यावेळी तीची दहावीची परीक्षा सुरू असल्याने आई-वडिलांनी पाठविण्यास नकार दिला. त्यावरून आरोपींनी भांडण केले. २० मार्च २०१४ रोजी याच कारणावरून काजोलचा भाऊ सतीश कालापाड यास मारझोड करण्यात आली.दरम्यान, २१ मार्च २०१४ रोजी पुन्हा एकवेळ आरोपींनी काजोलच्या घरी येवून तीचे वडिल लक्ष्मण कालापाड, आई नंदाबाई कालपाड यांना शिविगाळ केली. तसेच आरोपी सुधाकर नवघरे याने त्याच्या बॅगमधून कुकरी नावाचे शस्त्र काढून काजोल, लक्ष्मण व नंदाबाई यांच्यावर वार केले. त्यात नंदाबाई कालापाड ह्या जागेवरच मरण पावल्या; तर काजोल व तिच्या वडिलांचे प्राण सुदैवाने बचावले.सदर घटनेची फिर्याद काजोल लक्ष्मण कालापाड हिने अनसिंग पोलिस स्टेशनला दाखल केल्यावरून पोलिसांनी सुधाकर नवघरे, विश्वास नवघरे, प्रदिप नवघरे आणि लिलाबाई नवघरे अशा चार आरोपींविरूद्ध कलम ३०७, ३०२, ५०४, ५०६, १०९ अन्वये गुन्हे दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. सरकारच्या वतीने याप्रकरणी १० साक्षीदार तपासण्यात आले. साक्ष आणि पुरवे ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही. जटाळे यांनी नमूद चारही आरोपींना दोषी ग्राह्य धरून जन्मठेप सुनावली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विनोद फाटे यांनी काम पाहिले.