पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारखेडा ग्रामपंचायतीने संगणक परिचालक प्रफुल भानुदास जाधव याला फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत थेट सहभाग घेतल्याने ८ एप्रिल २०२१ च्या मासिक सभेत ७ विरुद्ध १ असा ठराव पारित करून तो मानारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवित कामावरून कमी करण्याची शिफारस करण्यात आली होती. हे प्रकरण २ महिन्यांपासून प्रलंबित आहे. तो ठराव माजी सरपंच भानुदास भिका जाधव यांच्या जिव्हारी लागला.
त्यामुळे २९ जून रोजी सरपंच पती बबन नारायणराव सोळंके हे दुचाकीने घरी जात असताना गावातील ऑटो थांब्यावर प्रफुल भानुदास जाधव व भानुदास भिका जाधव यांनी दुचाकी अडविली व बबन सोळंके यांना अश्लील शिविगाळ करून मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ते घरी गेल्यावर प्रफुल जाधव, मिथुन जाधव, जितेंद्र जाधव यांनी घरात घुसून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी फ़िर्यादी बबन नारायणराव सोळंके यांच्या तक्रारीवरुन चारही आरोपी विरुद्ध कलम ३४१, ४५२, २९४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हे दाखल केले. तक्रार दाखल होताच तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सोनवणे यांनी अरोपींना अटक करून १ जुलै रोजी न्यायालयात हजर केले होते.