जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवारी नव्याने तीन रुग्ण आढळून आले तर चार रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. वाशिम व मालेगाव तालु्क्याचा अपवाद वगळता उर्वरित चार तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१६५१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६३५ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
चार तालुके निरंक
बुधवारच्या अहवालानुसार रिसोड, मंगरुळपीर, मानोरा व कारंजा तालुक्यात तसेच मालेगाव व वाशिम शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. बुधवारीदेखील जिल्ह्यातील एकाही प्रमुख शहरात कोरोना रुग्ण आढळून आला नसल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.
०००००००
३५ सक्रिय रुग्ण
बुधवारच्या अहवालानुसार नव्याने तीन रुग्ण आढळून आले तर चार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ३५ रुग्ण सक्रिय आहेत.
०००००००००
पोर्टलवर १३ मृत्यूची नोंद
गेल्या काही दिवसात जिल्ह्याबाहेर झालेल्या आणखी १३ मृत्यूची नोंद बुधवारी पोर्टलवर झाली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबळींचा आकडा ६३५ वर गेला आहे.