वाशिम : शनिवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, आता एकूण रुग्णसंख्या १२२ झाली आहे. यापैकी ३६ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे एप्रिल महिन्यात आढळला होता. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मे महिन्याच्या अखेरपासून परजिल्हा, परराज्यातून मोठ्या संख्येने नागरीक जिल्ह्यात दाखल झाले. बाहेरगावावरून जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांमुळे जून महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली होती. १ जुलै रोजी कोरोनाबाधित रुग्णसंख्येने शतक ओलांडले. जुलै महिन्यातही कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा अधिक अलर्ट झाली. शनिवार, ४ जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये 'आयएलआय'ची लक्षणे असलेले मालेगाव येथील २६ व ३४ वर्षीय पुरुष, नागपूर येथे कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील मंगरुळपीर येथील २९ वर्षीय पुरुष आणि औरंगाबाद येथून हराळ (ता. रिसोड) येथे परतलेल्या २५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आता एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या १२२ झाली असून, यामध्ये ३६ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यात जिल्ह्यातील १०९, तर वाशिम जिल्ह्यातील रहिवासी; परंतु परजिल्ह्यात उपचार घेणाºया १३ जणांचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात २९ तर जिल्ह्याबाहेर सात अशा एकूण ३६ जणांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोनामूक्त होणाºया रूग्णांचे प्रमाणही वाढतच असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत ८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने वाशिम, मंगरूळपीर, रिसोड व कारंजा शहरातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी व शरीरातील आॅक्सिजन पातळी तपासणी मोहिम २१ जूनपासून सुरू केलेली आहे. या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षणही करण्यात येत आहे. ४ जुलैपर्यंत जवळपास ७० हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
वाशिम जिल्ह्यात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १२२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 1:01 PM