लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील वाशिम आणि मंगरुळपीर तालुक्यातील ४ इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्यास शासनाने १९ जानेवारी रोजी मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि वाशिम तालुक्यांतर्गत येणाºया ४ इतर जिल्हा मार्गांची दर्जोन्नती करण्याची मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली होती. सदर मागणीस अनुसरून सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावतीच्या मुख्य अभियंत्यांकडे पत्र पाठवून प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर विचार करून शासनाने मागणीनुसार चार जिल्हा मार्गांची जिल्हा प्रमुख मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्यास मंजुरी दिली आहे. या अंतर्गत काटा-तामसी-तांदळी-मोहजा, या १७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची प्रमुख जिल्हा मार्ग ४७ या नावाने, फाळेगाव थेट-शिरपुटी-कृष्णा-वाई-सावळी ते बेलोरा या १९.७०० किलोमीटर लांबीच्या मार्गाची प्रमुख जिल्हा मार्ग ४८ या नावाने, वारला-वाई-जयपूर-सावळी या १२.६०० किलोमीटर लांबीच्या जिल्हामार्गाची प्रमुख जिल्हा मार्ग ४९ म्हणून, तर कळंबा महाली(राज्यमार्ग-८९)-खरोळा-वारा-कुंभी ते प्रमुख जिल्हामार्ग क्रमांक ४ या १९ किलोमीटर लांबीच्या मार्गाची प्रमुख जिल्हा मार्ग ५० म्हणून दर्जोन्नती करण्यात येणार आहे. या मार्गाच्या दजोन्नतीमुळे रस्ते विकास योजना २००१-२१ मधील वाशिम जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या लांबीत ६०.३०० किलोमीटरने वाढ होऊन जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाची एकूण लांबी १०१८.७३० एवढी होईल, तर जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांच्या लांबीत घट होऊन ती ७६३.७१० होणार आहे. या निर्णयाची प्रत जिल्हाधिकारी वाशिम, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठविण्यात आली आहे.
वाशिम जिल्ह्यातील चार मार्गांची प्रमुख जिल्हामार्ग म्हणून दर्जोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 1:41 PM