वाशिम : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाशिम नगरपालिकेने शहरातील अनधिकृतपणे उभारण्यात आलेली १८ धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेला शुक्रवारी दुपारनंतर प्रारंभ केला. पहिल्या दिवशी शहरातील चार धार्मिक स्थळे हटविली असून, संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली. २९ सप्टेंबर २00९ नंतर उभारण्यात आलेली अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कषित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिकेने शहरातील धार्मिक स्थळांची पाहणी केली होती. पाहणी दरम्यान शहरातील १८ धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले होते. पालिका प्रशासनाने संबंधिताना नोटीस बजावून अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच याप्रकरणी हरकती दाखल करण्याचे आवाहन केले होते. या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर नगर परिषद प्रशासनाने शुक्रवारी अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कषित करण्याच्या मोहिमेला प्रारंभ केला. यामध्ये गव्हाणकर नगर परिसरातील हनुमान मंदिर, पोलीस अधीक्षक निवासाजवळील हनुमान मंदिर, सिव्हिल लाइन येथील पोलीस उपविभागीय कार्यालय परिसरातील हनुमान मंदिर व सामान्य रुग्णालयाजवळ असलेले हनुमान मंदिर निष्कषित करण्यात आले. उपरोक्त कारवाई करण्यासाठी तहसीलदार बळवंत अरखराव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेट्टे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र देशमुख, नायब तहसीलदार देवळे, पोलीस उपनिरीक्षक वाढवे, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर, नगर परिषदेचे विजय घुगरे, नियोजन विभागाचे खंडारे, उज्ज्वल देशमुख यांच्यासह वाशिम तहसील, नगर परिषद व पोलीस दलाचे कर्मचारी तैनात होते.
चार अनधिकृत धार्मिक स्थळे जमीनदोस्त
By admin | Published: June 25, 2016 1:07 AM