वाशिम (संतोष वानखडे) : सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून १७ लाख ७५ हजाराने गोवर्धन (ता.रिसोड) येथील माजी सैनिकाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, स्थानिक गुन्हे शाखेने पाच आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अनेकजण अभ्यास करून प्रयत्न करीत आहेत तर काही जण आर्थिक व्यवहार करून ‘शॉर्टकट’ मार्गाने सरकारी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नांतून फसवणूकही होऊ शकते.
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याच्या तीन घटना जिल्ह्यात यापूर्वी घडल्या होत्या. आता रिसोड तालुक्यातील गोवर्धन येथील एका सुशिक्षित युवकासोबतही असाच प्रकार घडला आहे. गोवर्धन येथील उद्धव सदाशिव तहकिक हे माजी सैनिक असून त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगून आरोपींनी त्यांची फसवणूक केली. या प्रकरणात आरोपींनी फिर्यादी उद्धव सदाशिव तहकिक यांच्याकडून १२ लाख ५० हजार रुपये व साक्षीदार वैभव राऊत यांचेकडून ५ लाख २५ हजार रुपये असे एकूण १७ लाख ७५ हजार रुपये घेऊन फिर्यादी व साक्षीदारास सरकारी नोकरीचे खोटे व बनावट ओळखपत्र व सरकारी नोकरीची ऑर्डर देऊन फसवणूक केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून शिरपूर पोलीस स्टेशनला आरोपीविरूद्ध कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४७२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ५ आरोपी निष्पन्न झाले असून तपासात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत २ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा वाशिमने तपासकामी ताब्यात घेतले असून, ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या पथकाने केली.
नागरिकांनो, फसवणुकीपासून सावध राहा
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याच्या तीन घटना जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. पैसे घेऊन सरकारी नोकरी मिळवून देतो असे सांगणाऱ्या लोकांपासून दूर राहून स्वतःची आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलाने केले.