लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. वाशिम जिल्ह्यात एकूण प्रवेशाच्या जागेएवढेही अर्ज आले नसल्याने तसेच वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही पालकांचा प्रतिसाद न मिळाल्याने जवळपास ३० टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.शिक्षण हक्क कायद्याने दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले आहे. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. वाशिम जिल्ह्यात ८२ शाळांमध्ये आॅनलाईन प्रवेश अर्जाची कार्यवाही राबविण्यात आली. तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश प्रक्रियेला वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली. ८२ शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश क्षमतेच्या एकूण ९०८ जागा आहेत. मे महिन्यात पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या फेरीपर्यंत एकूण ६०१ जागांवर प्रवेश निश्चित करण्यात आले. याची टक्केवारी ६६ अशी होती. मोफत प्रवेशाच्या उर्वरीत जागा रिक्त राहिल्याने १२ जुलैपर्यंत संबंधित शाळांमध्ये आॅनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीनंतरही जागेएवढे अर्ज आले नाहीत. वाशिम जिल्ह्यात ९० च्या आसपास अर्ज आले होते. त्यामुळे जवळपास २०० जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील मोफत कोट्यातील जागा रिक्त राहण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी अंबादास मानकर म्हणाले की, अंतिम मुदतीनंतरही जवळपास २० ते २५ टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. शासन निर्णय व वरिष्ठांच्या सूचनेनुसार रिक्त जागा भरण्याची कार्यवाही केली जाईल, असे मानकर यांनी स्पष्ट केले.