वाशिम : अनलॉकच्या टप्प्यात आरटीई अंतर्गतची मोफत प्रवेश प्रक्रियाही निकाली निघाली असून, लॉटरी पद्धतीतून निवड झालेल्या बालकांना ११ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येतात. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दिव्यांग गटातील बालकांना पहिल्या वर्गात २५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्यासाठी चालू शैक्षणिक सत्रात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील १०३ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी ७१८ जागा राखीव आहेत. ७ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या पहिल्या लॉटरी पद्धतीत १११९ अर्जातून ६३० बालकांची निवड झाली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे प्रवेश प्रक्रिया ठप्प होती. आता अनलॉक झाल्याने मोफत प्रवेश प्रक्रियाही निकाली निघाली आहे. ११ जून २०२१ पासून शाळांनी पालकांना प्रवेशाकरिता पोर्टलवर तारीख द्यावी लागणार आहे. त्यानुसार बालकांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांना आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे. प्रवेश घेण्याकरिता २० दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे.
०००००००
एक नजर प्रवेश प्रक्रियेवर
एकूण शाळा १०३
राखीव जागा ७१८
प्राप्त अर्ज १११९
विद्यार्थी निवड ६३०
००००००००
बॉक्स
शाळेच्या प्रवेशद्वारावर सूचना फलक झळकणार !
जिल्ह्यात आरटीई अंतर्गत एकूण १०३ शाळांची नोंदणी झाली आहे. ११ जूनपासून संबंधित शाळांना निवड झालेल्या बालकांना प्रवेश देण्यासाठी पोर्टलवर तारीख द्यावी लागणार आहे. आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश सुरू झाले आहेत, असे सूचना फलक शाळेच्या प्रवेशद्वारावर लावण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार शाळांना प्रवेशद्वारावर सूचना फलक लावावे लागणार आहे.
०००००००
बॉक्स
शाळा व निवासस्थानादरम्यानच्या अंतराची पडताळणी
बरेच पालक शाळेत प्रवेश मिळावा यासाठी आरटीई प्रवेश फॉर्म भरताना चुकीचे अंतर दाखवित असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे कागदपत्रांवरून शाळा व निवासी पत्त्याच्या अंतराची पडताळणी करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या. चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देऊ नये. अशा पालकांना तालुकास्तरीय समिती किंवा शिक्षणाधिकारी यांचेकडे अर्ज करण्यास सांगावे, अशा सूचनाही शाळांना देण्यात आल्या.
००००
कोट बॉक्स
अनलॉकच्या टप्प्यात ११ जूनपासून मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यात आरटीई अंतर्गत १०३ शाळांची नोंदणी झाली आहे. पहिल्या लॉटरी पद्धतीत जिल्ह्यातील ६३० बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. शाळांना संबंधित पालकांना प्रवेशाबाबत तारीख द्यावी लागणार आहे.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम