- संतोष वानखडेवाशिम : शिक्षण हक्क कायद्यानुसार (राईट टु एज्युकेशन/आरटीई) पहिल्या लॉटरी पद्धतीत अमरावती विभागातील १० हजार ५६ बालकांची मोफत प्रवेशासाठी मार्च महिन्यात निवड झाली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाउन असल्याने कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया ठप्प झाली. मोफत प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार, याकडे पालकांचे लक्ष लागून आहे.शिक्षण हक्क कायद्याने मागासवर्गीय, दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. त्यानुसार आॅनलाईन प्रवेश अर्ज, लॉटरी पद्धतीतून निवड आणि कागदपत्र पडताळणी आदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत प्रवेश दिला जातो. आॅनलाईन अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांची पहिल्या लॉटरी पद्धतीतून अमरावती विभागातील १० हजार ५६ बालकांची मार्च महिन्यात मोफत प्रवेशासाठी निवड झाली. वाशिम जिल्ह्यात १०११ जागेसाठी ९७६ बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. याप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात १७०१ जागेसाठी १६४७ बालकांची निवड झाली. अकोला जिल्ह्यात २३२३ जागेसाठी २२७८, अमरावती जिल्ह्यात २४८६ जागेसाठी २४५६ तर बुलडाणा जिल्ह्यात २७८५ जागेसाठी २६९९ बालकांची निवड झालेली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन व संचारबंदी असल्याने तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कागदपत्र पडताळणी पुढील सूचनेपर्यंत थांबविण्यात आली आहे. लॉकडाउन संपल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होऊन बालकांना संबंधित शाळेत प्रवेश दिले जाणार आहेत. तुर्तास लॉकडाउनमध्ये मोफत प्रवेश अडकले असून, प्रवेश कधी होतात याकडे पालकांचे लक्ष लागून आहे.
पहिल्या लॉटरी पद्धतीत वाशिम जिल्ह्यात ९७६ बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. ज्या विद्यार्थ्यांची लॉटरी पद्धतीत निवड झाली आहे, त्यांना पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतर पंचायत समितीस्तरावरील शिक्षण विभागाच्या पडताळणी समितीकडे आवश्यक ती कागदपत्रे घेऊन जावे लागणार आहे. वरिष्ठांच्या सुचनेनुसार जिल्ह्यात मोफत प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.- अंबादास मानकर,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम.