लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागातही होत असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील १० लाख नागरिकांना केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या होमिओपॅथी व आयुर्वेद औषधीचे मोफत वाटप केले जाणार होते. मात्र, या औषधीवर मध्यंतरी प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने जिल्हा परिषदेने हा उपक्रमही तुर्तास थांबविला. राज्याचा आरोग्य विभाग व राज्य शासनाकडून स्पष्ट मार्गदर्शन व दिशानिर्देश मिळाल्यानंतर हा उपक्रम राबविण्यात येईल, असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने स्पष्ट केले.अलिकडच्या काळात ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत आहे. ९० पेक्षा अधिक गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा धोका वाढलेला असल्याने ग्रामीण भागात आरोग्य विभागातर्फे विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्रालय यांचे निर्णयानुसार कोरोना ससंर्ग टाळण्यासाठी तसेच या आजारात रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने काही औषधांच्या शिफारसी केल्या. त्यापैकी अर्सेनिक अल्बम ३० व संशमनी वटी हे होमिओपॅथी व आयुर्वेदीक औषध कोरोना आजारात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते, अशी शिफारस मध्यंतरी झाली होती. त्यानुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने शिल्लक निधीमधून या औषधाचा ग्रामीण भागातील १० लाख नागरिकांना मोफत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. परंतू, त्यानंतर होमिओपॅथी व आयुर्वेदीक औषधीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने आरोग्य समितीने ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका ठेवत आरोग्य विभाग व शासनाकडून मार्गदर्शन मागविले. अद्याप स्पष्ट सूचना प्राप्त न झाल्याने हा निर्णयही अधांतरीच आहे.
प्रस्ताव तयार ; मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच कार्यवाहीरोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी व आयुर्वेद औषधीचे वाटप करावे की नाही याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले. औषधीसंदर्भातील प्रस्तावही तयार आहे. शासनाकडून स्पष्ट सूचना प्राप्त होताच, मार्गदर्शक सूचनानुसार ग्रामीण भागातील १० लाख नागरिकांना औषधीचे वाटप केले जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषधी साठापावसाळ्याचे दिवस लक्षात घेता तसेच कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात सर्दी, खोकला, ताप, अतिसार यासह अन्य महत्वाचा औषधी साठा उपलब्ध करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होत असल्याने नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आयुर्वेद व होमिओपॅथी औषधीचे मोफत वाटप ग्रामीण भागातील १० लाख नागरिकांना करण्याचा निर्णय घेतला होता. मध्यंतरी या औषधीसंदर्भात द्विधा स्थिती निर्माण झाल्याने हा निर्णय थांबविण्यात आला. शासनाकडून स्पष्ट दिशानिर्देश प्राप्त होताच, या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल.
- चक्रधर गोटे,आरोग्य सभापती, जि.प. वाशिम