सुकांडा गावात गत महिनाभरापासून कोरोनाने थैमान घातले. गावात १५०पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून आल्याने दहशत निर्माण झाली. संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासह बाधित रुग्णांना रुग्णालयात हलविण्यासाठी तातडीची पावले उचलली. सौम्य लक्षणे असणाऱ्या अथवा लक्षणेच न दिसणाऱ्या रुग्णांना घरी अथवा शेतशिवारात विलगीकरणात ठेवण्यात आले. यासह इतरही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची चोख अंमलबजावणी केल्याने संसर्गाच्या संकटाची धार गावात आता कमी झाली आहे.
दरम्यान, कोरोना संकटामुळे गावातील मजुरांना पुरेसा रोजगार उपलब्ध नाही. अशा अवस्थेत दवाखान्याचा महागडा खर्च गोरगरिबांना पेलवणारा नाही, याची जाण ठेवून माजी पंचायत समिती सदस्य उल्हासराव घुगे यांच्या मार्गदर्शनात सरपंच कैलासराव घुगे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सॅनिटायझर, मास्क, यासह सर्दी, ताप, खोकला आदी आजारांवरील औषधांचे मोफत वितरण केले. यावेळी राजुरा आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे आरोग्य सेवक अनिस कुरेशी, आरोग्य सेविका जयश्री धांदू, आशा स्वयंसेविका शशिकला अवचार, सुनीता आंधळे यांची उपस्थिती होती.