लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली, दुसरीमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या शाळांमध्ये सन २०२०-२१ मध्ये इयत्ता पहिली, दुसरीमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाºया विद्यार्थांनी १५ फेब्रुवारीपर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला येथील कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी आर.बी. हिवाळे यांनी केले. अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागातर्फे विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली, दुसरीमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी संबंधित विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या नावे सक्षम प्राधिकाºयाने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत पालकांना अर्जासोबत सादर करावी लागणार आहे. वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा १ लाख रुपये इतकी राहणार आहे. पहिलीमध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांचे वय ६ वर्षे पूर्ण असावे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल. विद्यार्थ्याच्या पालकांनी प्रवेश अर्जासोबत संमतीपत्र व दोन पासपोर्ट फोटो जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत बंधनकारक आहे. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द केला जाईल, असा इशारा प्रकल्प अधिकारी हिवाळे यांनी दिला. (प्रतिनिधी)
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षणाची मोफत सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 6:05 PM