लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगारासाठी युवक, युवतींना प्रशिक्षीत करण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत विनामुल्य कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी इच्छूकांकडून ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.किमान कौशल्य कार्यक्रमांतर्गत युवक, युवतींचे कौशल्य विकासाव्दारे सक्ष्मीकरण करुन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यात येत आहे. सन २०१८-१९ या वर्षाकरीता जिल्हयातील कौशल्य प्रशिक्षण घेण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांना मशरुम, कल्टीवेटर, प्लंबर, फ्रिज, वातानुकूलीत यंत्र दूरुस्ती, पल्स प्रोसेसिंग, खाद्य तेल प्रक्रिया, कृषी अधारीत उत्पादने, आॅटोमोटीव सर्व्हिसिंग, सहाय्यक कामे, आरोग्य विषयक, बहुउद्देशिय कार्यकर्ता, मशिन आॅपरेटिंग, लुम फिटर, फोर व्हिलर दूरुस्ती आदी क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ३० नोव्हेंबरपर्यंत संबंधित क्षेत्राच्या प्रशिक्षणाकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे प्रत्यक्ष येऊन नोंदणी करावी लागणार आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमच्या सहाय्यक संचालकांनी दिली.
युवकांना मिळणार मोफत रोजगारविषयक प्रशिक्षण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 3:08 PM