वाशिम : काेराेना संसर्गामुळे अनेकांना अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. या काळात मानव सेवा करण्याच्या उद्देशाने येथील मानव सेवा फाउंडेशन व पाेलीस मित्र समन्वय समितीतर्फे काेविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या काेराेना रुग्णांना माेफत भाेजन पुरविण्याचे कार्य हाती घेतले आहे. प्रतिदिन ४०० जेवणाचे डबे पुरविण्यात येत आहेत.
वाशिम शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मानव सेवा फाउंडेशनने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सद्य:स्थितीत आलेल्या काेराेना संकटामध्ये मानव सेवा करण्याच्या उद्देशाने फाउंडेशनमध्ये असलेल्या अनेक युवकांनी काेराेना संसर्ग झालेल्यांना माेफत जेवणाचे डबे पुरविण्यावर चर्चा केली. यावेळी या उपक्रमाचे सर्वांनी काैतुक करून विलंब न करता राबविण्याचे ठरविण्यात आले. दरराेज काेविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना सकाळी २०० व रात्रीच्या जेवणाचे २०० डबे पुरविण्याचे कार्य फाउंडेशनमधील युवकांकडून केले जात आहे. याकरिता मानव सेवा फाउंडेशन व पाेलीस मित्र समन्वय समितीचे प्रा. हरिदास बन्साेड, डाॅ. शिवानंद गाजरे, विशाल ताजणे, अजय माेतीवार, राजू डाेंगरदिवे, भूषण देशपांडे, संताेष टाेलमारे, वैभव ताजणे, वेदांत गांजरे, संदीप बन्साेड आदी परिश्रम घेत आहेत.
................................