लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात रेती घाटांचा लिलाव नसल्याने घरकुल लाभार्थींना मोफत पाच ब्रास रेतीही मिळू शकली नाही. अगोदरच अनुदान प्रलंबित आणि त्यातच मोफत रेतीही नाही, यामुळे घरकुल लाभार्थी अडचणीत सापडले आहेत.दारिद्र्यरेषेखालील तसेच पक्के घर नसणारे, आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थींना विविध योजनेंतर्गतच्या घरकुलाचा लाभ दिला जातो. लाभार्थींना दिलासा म्हणून जानेवारी २०१९ मध्ये घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास मोफत रेती देण्याची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसे शासन आदेशही जानेवारी २०१९ मध्ये निघाले. अद्यापही याचा लाभ लाभार्थींना मिळाला नाही. दुसरीकडे घरकुल योजनेंतर्गतचे अनुदान अनियमित असून, मोफत रेतीही मिळत नसल्याने घरकुलांचे बांधकाम पूर्ण कसे करावे? असा प्रश्न लाभार्थींमधून उपस्थित होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन घरकुलासाठी मोफत रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लाभार्थींनी बुधवारी केली.
मोफत रेतीसाठीचे अर्ज धूळ खातजिल्ह्यात तहसिल स्तरावर पात्र लाभार्थींकडून मोफत रेतीसाठी अर्जही मागविले. परंतू, तालुक्यातील एकाही लाभार्थीला अद्याप मोफत रेती मिळू शकली नाही. मोफत रेतीसाठीचे अर्ज धूळ खात पडले. जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव रखडल्याने रेतीच उपलब्ध नाही. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही, असे जिल्हा खनिकर्म विभागातर्फे सांगितले जात आहे.