लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. २५ टक्के कोट्यातील जागा रिक्त असल्याने या जागेसाठी संबंधित शाळेत आॅनलाईन अर्ज केल्यानंतर, अर्ज पात्र ठरल्यास प्रवेश मिळणार आहे. रविवार, ९ जुलैपर्यंत आॅनलाई़न अर्ज करता येणार आहे.शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन म्हणजेच आरटीई) दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यापूर्वी संबंधित शाळांना आॅनलाईन नोंदणी करून इत्यंभूत माहिती सादर करावी लागते. वाशिम जिल्ह्यात ८२ शाळांनी नोंदणी केली. राज्यभरात ९ फेब्रुवारीपासून आॅनलाईन प्रवेश अजार्ची प्रत्यक्ष कार्यवाही राबविण्यात आली. तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश प्रक्रियेला वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली होती. तथापि, अंतिम मुदतीनंतरही पात्र शाळेतील २५ टक्के कोट्यातील सर्व प्रवेश पूर्ण होऊ शकले नाहीत.वाशिम जिल्ह्यातील ८२ शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश क्षमतेच्या एकूण ९०८ जागा आहेत. यापैकी १५० पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. कोणत्या शाळेवर किती जागा रिक्त आहेत, याचा लेखाजोखा जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाने तयार केला आहे. ज्यांनी यापूर्वी आॅनलाईन अर्ज सादर केले नाहीत, त्यांनादेखील आता संबंधित शाळेत आॅनलाईन अर्ज करता येणार आहे. सुरूवातीला अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ जूलै अशी होती. आता याला मुदतवाढ देण्यात आली असून, ९ जुलैपर्यंत आॅनलाईन अर्ज करता येणार आहे. वाशिम जिल्ह्यातील पालकांनी रिक्त जागांसाठी संबंधित शाळेत आॅनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी केले आहे.