मंगरूळपीर : तालुक्यातील पांगरी महादेव या गावात ज्याप्रमाणे सूक्ष्म पाणलोटाचे काम सुरू आहे, त्याप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र असे काम करून वाशीम जिल्हा टँकरमुक्त करा, अशा सूचना केंद्रीय रस्ते विकास व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दुर्गम व उपेक्षित पांगरी ( महादेव ) या लोकवस्तीमधील लोकसहभागाने निर्माण झालेल्या तलावाचे २७ मे रोजी पांगरीवासीयांसोबत झालेल्या आभासी सभेत लोकार्पण करताना केल्यात.
यावेळी श्रमदानातून केल्या जाणाऱ्या पांदन रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. जिल्ह्यातील जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी उपेक्षित व मागासलेले गावे दत्तक घेऊन कार्यरत असतात. गेल्या सात महिन्यापासून अत्यंत दुर्लक्षित वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात पांगरी (महादेव) या लोकवस्तीमध्ये कार्यरत आहे. जलविभाजक रेषा (divide line or water shade) असलेल्या भू-क्षेत्रातील लोकसंख्या तब्बल ८०० पेक्षा अधिक असून २१ वर्षांपासून या पांगरी ( महादेव ) लोकवस्तीला गाव म्हणून शासन दप्तरी ग्रामपंचायत नाही, ना गट ग्रामपंचायत नाही. यामुळे विकासापासून दुर्लक्षित आहे. एवढ्या मोठ्या लोकवस्तीला ग्रामपंचायत दर्जा नसल्यामुळे कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. लोकवस्तीत सर्वांत मोठा प्रश्न पाण्याचा असून एक कि.मी. अंतरावरून एका खासगी विहिरीतून पाणी आणावे लागते. गावात अति कॅल्शियमयुक्त पाणी असल्यामुळे सहा रुग्णाचे मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू पावले, तर सात रुग्ण मुत्रपिंडाच्या आजाराने डायलिसिसवर आहे. ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून सचिन कुळकर्णी यांनी या भटक्या विमुक्त समुदाय असलेल्या वनग्राम पांगरीमध्ये कार्यरत होऊन पुढाकार घेतला. लोकवस्तीमध्ये स्वहक्काचे मुबलक पाणी असल्यास विकासाला गती प्राप्त होते, हा सिद्धांत गावकऱ्यात पटवून सूक्ष्म उपपाणलोट राबविण्याचा संकल्प केला. पहिली पायरी म्हणून लोकसहभागातून १०० बाय १०० बाय ३ मीटरचा भव्य गावतलाव पडीक जमिनीवर निर्माण केला. नुकत्याच अचानक काही मिनिटे झालेल्या अवकाळी पावसामुळे, खोलीकरण-रुंदीकरण झालेल्या नाल्यात तुडुंब पाणी भरल्याने गावकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. नवनिर्माण केलेल्या तलावाचे लोकार्पण, श्रमदानातून होणाऱ्या पांदन रस्त्यांचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते केल्या गेले. या कार्याला दत्ताजी जामदार, माधव कोटस्थाने, व्ही. डी. पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी भरीव सहकार्य केले आहे. आभासी सभेद्वारे जेव्हा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा गावकऱ्यांचा आनंद पारावर उरला नव्हता.