मंगरूळपीर : विविध मागण्यासाठी भूमिहीन गायरानधारकांनी १९ जून रोजी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मानवी हक्क अभियान संघटनेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दादासाहेब क्षीरसागर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात ग्रामीण भागातून मोठय़ा संख्येने भूमिहीन गायरानधारक सहभागी झाले होते. यावेळी दादासाहेब क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात भूमिहीन गायरान धारकाच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले, गायरान धारकांच्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्या आहेत. यामध्ये विशेषत: वनजमिनी व गायरान त्वरित कास्तकाराच्या नावाने कराव्या, संविधानिक घटनेची अंमलबजावणी न करणारे प्रशासनावर जातीय प्रतिबंधक कारवाई करून गुन्हा दाखल करावा, बेघर कुटुंबाना शासकीय जागा उपलब्ध करून घरकुल बांधून देण्यात यावे. तसेच गायरान व वनजमिनीची ताब्यात असलेल्या जमिनीची मशागत करण्यासाठी विरोध करणार्यावर कडक कारवाई करून तसेच पेरलेले पिकाचे संरक्षण करून पेरलेली पीक उद्धवस्त करणार्याविरूद्ध राष्ट्रीय द्रोहाचेगुन्हे दाखल करावे. याशिवाय राज्यातील स्त्रियावर रोजच अन्याय, अत्याचार व बलात्कार होत असून स्त्रियांना स्वत:च्या संरक्षणासाठी विनाअट बंदुकाचे परवाने द्यावे, श्रीमंतांचे बीपीएल कार्ड रद्द करून गरजूंना त्वरित कार्ड वाटप करावे अशा विविध मागण्यात करण्यात आल्या.या मोर्चात संघटनेच्या राज्य महिला प्रमुख रोहिणीताई खंडारे, दयाराम इंगोले, वसंत मोरे, ज्ञानेश्वर तायडे, कैलास पंडित, नेमीचंद चव्हाण, वैशाली पवार आदी सहभागी झाले होते.
भूमिहिन गायरान धारकांचा मोर्चा
By admin | Published: June 20, 2014 12:10 AM