लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन औषध निर्मात्या कंपन्यांना ६० लाखांच्या औषधीचे बनावट पुरवठा आदेश देवून हेराफेरी करणारा फार्मसी अधिकारी कांताप्रसाद तिवारी याच्याविरुध्द २८ जानेवारीला गुन्हे दाखल झाले. मात्र, तेव्हापासून तिवारी पोलिसांच्या तावडीत सापडला नसून अद्याप फरारच असून पोलिसांच्या कार्यशैलीवर यामुळे प्रश्न उपस्थित केला जात आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये विविध प्रकारच्या औषधींचा पुरवठा केला जातो. उपलब्ध निधी आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी संबंधित औषधींचे पुरवठा आदेश दिल्यानंतर संबंधित पुरवठादार कंपन्यांकडून औषधी पुरविली जाते. असे असताना सन २०१७-१८ या वर्षात प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रांमध्ये औषधीचा पुरवठा करण्यासाठी औषध निर्माण अधिकारी कांताप्रसाद तिवारी यांनी चक्क जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून ६० लाख रुपयांच्या औषधीचे बनावट आदेश कंपन्यांना दिल्याची गंभीर बाब चौकशीत उघड झाली. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी २८ जानेवारीला वाशिम शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून कांताप्रसाद तिवारी याच्याविरूद्ध भादंविचे कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, तिवारीला जेरबंद करण्यात पोलिसांना अद्याप यश मिळू शकले नाही. तिवारी सद्या अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
६० लाखांच्या औषधीचे बनावट पुरवठा आदेश देणारा तिवारी अद्याप फरारच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 1:15 PM