वाशिम : कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असून, वाशिम जिल्ह्यात कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. एकाच दिवशी चारपेक्षा अधिक मृत्यू झाले तर स्मशानभूूमीत ‘वेटिंग’ची परिस्थिती असून, अग्निदहनासाठी इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. मृतदेहांची विल्हेवाट लावण्याकरिता इंधनाचा तुटवड़ा निर्माण झाल्यामुळे वाशिमच्या पद्मतीर्थ स्मशानभूमीत विद्युतदाह वाहिनी त्वरित सुरू करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.
कोरोना या महाभयंकर महामारीने संपूर्ण जगासह महाराष्ट्र व जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाय पसरले आहे. या महामारीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज झपाट्याने वाढत आहे. वाशिम शहरातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज वेगाने वाढत आहे. स्थानिक नगर परिषदेने कोविड आजाराने ग्रस्त असलेल्या व उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी पद्मतीर्थ मोक्षधाम येथे पर्यायी व्यवस्था निर्माण केली असून, अग्निदहनासाठी इंधनाचा तुटवड़ा झाला आहे. याबाबत शासन व प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. स्थानिक स्मशानभूमीत खासदार व आमदार या लोकप्रतिनिधींनी कोविड विषाणूने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांकरिता एक तसेच नैसर्गिक मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांसाठी वेगळी एक अशा दोन विद्युतदाह वाहिनी उभारण्याची गरज आहे. नगरपालिकेने त्यासाठी इमारतीचे बांधकाम तसेच दानदात्यांनी सौरऊर्जा उपलब्ध करून दिल्यास विद्युत दाहिनीबाबतचे खूप मोठे कार्य होऊ शकेल, असे मत व्यक्त होत आहे.