वाशिम : सध्या सर्वत्र जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होऊन कट्टरतावाद वाढत आहे. प्रेम व जिव्हाळ्याच्या नात्याऐवजी द्वेषाची भावना रुजत आहे. मात्र कट्टरतावाद व द्वेषाचे राजकारण देशासाठी घातक आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा काॅंग्रेसचे विधीमंडळ नेते बाळाळासाहेब थोरात यांनी रविवारी (दि.२) रात्री ७ वाजता स्थानिक शासकिय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत केले.
काॅंग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असून, ही यात्रा वाशिम जिल्ह्यातूनही जाणार असल्याने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी वाशिम येथे आले असता, थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, देशात एकतेचा संदेश देण्यासाठी काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मिर भारत जोडो यात्रा काढण्यात आली आहे. संतांची आणि समाजसुधारकांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातही जनतेचा विश्वास मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. नांदेड, हिंगोली मार्गे वाशिम जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात ही यात्रा आगमन करणार असल्याची माहिती थोरात यांनी यावेळी दिली. लोकशाहीवर ज्यांचा विश्वास आहे, त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे, असेही थोरात म्हणाले. यावेळी आमदार व काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अमित झनक, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, यशोमती ठाकूर, एड.दिलीपराव सरनाईक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.