आपले सरकार केंद्र; संगणक नादुरुस्तच
वाशिम : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रातील बहुतांश संगणक नादुरुस्त आहेत. यामुळे शेती, घर यासह इतर स्वरूपातील व्यवहारांकरिता लागणारी महत्त्वाची कागदपत्रे घेण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रात येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधितांनी लक्ष देऊन संगणक दुरुस्ती करावेत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
मोकाट श्वानांचा बंदाेबस्त करा
वाशिम : शहरातील खामगाव जीन, अल्लाडा प्लाट भागात विशेषत: रात्रीच्या सुमारास मोकाट श्वान अंगावर धावून येण्याचा प्रकार बळावला आहे. यामुळे वाहनचालक, नागरिक त्रस्त झाले असून न. प.ने या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
‘फायर ऑडिट’ प्रक्रिया रखडली
वाशिम : व्यापारी संकुलांमध्ये अग्नी अवरोधक यंत्र बसवून दरवर्षी ‘फायर ऑडिट’ व्हायला हवे, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे; मात्र ही प्रक्रिया रखडली आहे.
बसफेऱ्या नियमित सोडण्याची मागणी
वाशिम : एस. टी. महामंडळाच्या वाशिम, रिसोड आगारातील अकोला, शिरपूर मार्गावरच्या काही दैनंदिन बसफेऱ्या अनियमित आहेत. त्या नियमित सोडण्यात याव्यात, अशी मागणी आकाश कांबळे यांनी केली.
ब्लिचिंग पावडरचा अनियमित वापर
वाशिम : पावसाळ्याचे दिवस असतानाही काही ग्रामपंचायती जलकुंभात ब्लिचिंग पावडरचा वापर नियमित करीत नसल्याचे दिसून येते. दूषित पाणीपुरवठा होऊ नये म्हणून पाण्यात ब्लिचिंग पावडरचा नियमित वापर करावा, अशी मागणी नागरिकांनी बुधवारी केली.
जुनी पेन्शन योजना लागू करावी
वाशिम : राज्यात ०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शालेय कर्मचाऱ्यांना विनाअट १९८२ ची जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी, अशी मागणी जुनी पेंशन कोअर कमिटीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे बुधवारी केली.
रस्ता कामास गती देण्याची मागणी
वाशिम : वाशिम-अकोला महामार्गावरून आययूडीपी काॅलनीत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या नूतनीकरणास सुरुवात झाली; मात्र हे काम संथ गतीने होत असून गती देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.