- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील १०२ पैकी ८५ ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र इमारतींसाठी (ग्रामपंचायत भवन) शासनाकडून निधी मिळून सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप बांधकामाला सुरुवात नाही. स्वतंत्र इमारतीअभावी या ग्रामपंचायतींचा कारभार भाडेतत्त्वावरील इमारतीतून सुरू असून पावसाळ्याच्या दिवसात ‘दप्तर’ सांभाळताना ग्रामसेवकांची कसरत होत आहे.जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, १०२ ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत नाही. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर अन्य कर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून वसूल केले जातात. स्वतंत्र इमारती नसल्याने या ग्रामपंचायतीचा कारभार भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू आहे. स्वतंत्र इमारत नसल्याने ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड जतन करताना ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची गैरसोय होते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने काही ठिकाणी इमारतीत पाणी गळती होत असल्याने महत्त्वाचे दस्तऐवज भिजण्याची भीतीही कर्मचाऱ्यांमधून वर्तविली जात आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारती नसल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. स्वतंत्र इमारत व परिसरात नसल्याने मासिक सभा, ग्रामसभा नेमक्या कुठे घ्याव्यात, असाही पेच निर्माण होतो. जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारतीसाठी निधी मिळावा, याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. डिसेंबर २०२० मध्ये ८५ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाला शासनाकडून मंजुरी मिळाली तर फेब्रुवारी २०२१ दरम्यान निधी मिळाला. परंतु, अद्याप बांधकामाला सुरुवात होऊ शकली नाही. लवकरच बांधकामाला सुरुवात होईल, असे सांंगण्यात येत आहे.
८५ ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामांना मंजूरी व निधी मिळालेला आहे. तालुकास्तरीय यंत्रणेकडे निधी सुपूर्ददेखील करण्यात आला. लवकरच बांधकामाला सुरूवातदेखील होईल.- विवेक बोंद्रेप्रभारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)जिल्हा परिषद वाशिम