८ फेब्रुवारी रोजी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे वाशिम जिल्हा वार्षिक योजना सन २०२१ - २२च्या प्रारूप आराखडा बैठकीत पवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, आमदार अॅड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. पवार म्हणाले की, जिल्ह्यातील कृषी विकासाला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून ५ कोटी ४४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून वाशिम येथे बांधण्यात येणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्राची इमारत ही ग्रीन बिल्डिंग असावी. जिल्हा वार्षिक योजनेत यंत्रणांना निधी देताना जिल्हाधिकारी यांनी आता आय - पास प्रणालीकडे लक्ष द्यावे. या प्रणालीअंतर्गत अमरावती विभागात उत्तम कार्य करणाऱ्या एका जिल्ह्याला ५० कोटी रुपयांचा आव्हान निधी देण्यात येणार आहे. हा निधी वाशिम जिल्ह्याला मिळाला पाहिजे, यासाठी प्रशासनाने काम करावे, असे पवार म्हणाले. वाशिम जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यात असल्याचे सांगून पवार म्हणाले, आकांक्षित जिल्ह्याचे सूत्र ठरवून जी रक्कम येते, त्यामध्ये वाढ करून जिल्हा वार्षिक योजना निधीचा समावेश करून जिल्ह्याचा सन २०२१ - २२चा आराखडा १८५ कोटीचा निश्चित करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील दलित वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी जलजीवन मिशनचा निधी वळती करून द्यावा किंवा अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत निधीची तरतूद करण्यात यावी. आमदार अॅड. सरनाईक म्हणाले, वाशिम येथील स्मशानभूमीत विद्युत दाहिनीसाठी नगरपरिषदेने निधीची मागणी केली आहे. त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, असे ते म्हणाले. आमदार झनक म्हणाले, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पावर जाणाऱ्या पोचमार्गांची दुरवस्था झाली आहे. त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करावी.
जिल्हा प्रारूप आराखडा सन २०२१ - २२चे सादरीकरण आणि सन २०२० - २१ या वर्षात झालेल्या खर्चाची माहिती जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिली. या सभेला उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.