- धनंजय कपालेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका आणि शिरपूर जैन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरटीपीसीआरच्या चाचणीसाठी घेण्यात आलेले घशातील स्रावाचे नमुने उघड्यावरच जास्त दिवस पडून राहिले. परिणामी त्या नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार १ मार्च रोजी उघडकीस आला. परिणामी वाशिम येथील प्रयोगशाळेने बुरशी आलेले ११० नमुने परत केल्यामुळे मालेगाव तालुक्यातील आरोग्य विभागाचा गलथान कारभार यानिमित्ताने उघडकीस आला आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला की नाही हे शोधून काढण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणी केली जाते. ही चाचणी करण्यासाठी संदिग्ध रुग्णाच्या घशातील स्रावाचा नमुना घेतला जातो. स्रावाचे नमुने घेण्यासाठी आता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुविधा करण्यात आली आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन आणि जऊळका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २४ फेब्रुवारीपासून घेतलेले नमुने आणि मालेगावमधील स्रावाचे असे एकूण ३१० नमुने घेऊन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी संतोष घुले हे १ मार्च राजी वाशिम येथील कोविड प्रयोगशाळेमध्ये सायंकाळी ५ वाजता घेऊन आले. या ३१० नमुन्यांपैकी २०० नमुने प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारले. उर्वरित ११० नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाल्यामुळे हे नमुने लॅबच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारण्यास नकार देऊन घुले यांना परत केले. परत केलेले नमुने घुले यांनी मालेगावच्या तालुका अधिकारी कार्यालयामध्ये रीतसर पाठवून दिले. ज्या ११० नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाली ते नमुने चार दिवसाआधीचे होते असे संबंधितांकडून सांगण्यात येत आहे.
त्या ११० लोकांचे नमुने परत घ्यावे लागणारजऊळका आणि शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत असलेल्या ज्या ११० लोकांचे नमुने बुरशीमुळे परत करण्यात आले. त्या ११० लोकांना परत बोलावून त्यांचे नमुने घेण्याची मोठी जबाबदारी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना पार पाडावी लागणार आहे.
नियम काय म्हणतो ? प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोनाची चाचणी करण्यासाठी घेण्यात आलेले घशातील स्रावाचे नमुने हे दोन ते आठ सेंटीग्रेट तापमानात ठेवावे लागतात. हे नमुने त्याच दिवशी सायंकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत प्रयोगशाळेमध्ये पोहचते करणे आवश्यक आहे. परंतु या सर्व नियमांची ऐशीतैशी करून आरोग्य अधिकारी जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार समोर येत आहे.
दोषींवर कोणती कार्यवाही होणार?११० स्त्राव नमुन्यांमध्ये तयार झालेली बुरशी ही ज्यांच्या चुकीमुळे झाली त्यांचेवर जिल्हा आरोग्य अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे. अतिशय संवेदनशील असलेल्या कोरोना महामारीला आटोक्यात आणण्याची जबाबदारी ज्यांचेवर दिलेली आहे, त्याच वैद्यकीय अधिकाºयांचा निष्काळजीपणा या घटनेमधुन अधोरेखीत झाला. साधे मास्क लावले नसेल तर एकीकडे शिक्षा होते. हा प्रकार तर मास्क पेक्षाही गंभीर स्वरूपाचा निश्चितच आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी या घटनेतील दोषींवर कोणती कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे.
मालेगाव येथील घडलेला प्रकार हा अतिशय गंभीर आहे. हा प्रकार नेमका कसा घडला, याची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना समज देण्यात येईल. यानंतर अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितले जाईल. यापुढे आरटीपीसीआरचे नमुने संकलीत करण्याची विशेष व्यवस्थाही होईल. - डाॅ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम