वाशिम : महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ ॲक्युपंक्चर (एमसीए)मधील पदाधिकाऱ्यांकडून घेतले जाणारे मनमानी निर्णय आणि ढिसाळ कारभारामुळे ‘थेरपिस्ट’चे भवितव्य धोक्यात सापडले आहे. त्याची सखोल चौकशी करून ॲक्युपंक्चर क्षेत्रातील घटकांना न्याय देण्याची मागणी अल्टरनेटिव्ह मेडिसीन डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने करण्यात आली. १६ सप्टेंबरला असोसिएशनने मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, वैद्यकीय मंत्री आदींना यासंदर्भात पत्र पाठविले.
पत्रात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील फार जुनी व प्रभावी उपचारपद्धती म्हणून नावलौकीक असलेल्या ॲक्युपंक्चर चिकित्सा प्रणालीतील तज्ज्ञ चिकित्सकांना कायदेशीर संरक्षण मिळावे, या हेतूने २०१७ मध्ये महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ ॲक्युपंक्चरची स्थापना करून व्यवस्थापनावर पदाधिकारी नियुक्त केले; मात्र, या पदाधिकाऱ्यांच्या एककल्ली व चुकीच्या निर्णयाचा फटका ॲक्युपंक्चर व्यावसायिकांना बसत आहे.
कौन्सिलला परीक्षा घेण्याचा कोणताही अधिकार नसताना पदाधिकाऱ्यांनी परीक्षेची घोषणा केली. काैन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी अवाजवी शुल्क आकारण्यात आले. व्यावसायिकांनी रितसर शुल्क भरल्यानंतर कौन्सिलकडून अचानक परीक्षा रद्द करण्यात आली. यामुळे थेरपिस्ट व्यावसायिकांचा मानसिक छळ होत असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणाची सखोल चाैकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
..................
कोट :
ॲक्युपंक्चर थेरपिस्टकडून अवाजवी आकारण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करावे, इतर परीक्षा मंडळांप्रमाणे वाजवी शुल्क आकारण्याचे आदेश महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काैन्सिलला द्यावे, काैन्सिलकडून १० ऑक्टोबर २०२१ रोजी पात्रता परीक्षा घेण्याचे ठरविले असून परीक्षा घेण्याचे अधिकार हे काैन्सिलला नसल्याने अधिकृत विभागाकडून परीक्षा देण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश द्यावे, यासह इतरही मागण्यांची पूर्तता करण्यासंबंधीचे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले आहे.
- डॉ. माधव हिवाळे
अध्यक्ष, अल्टरनेटिव्ह मेडिसीन डॉक्टर्स असोसिएशन