मालेगाव (जि. वाशिम ): अतिक्रमणामुळे मालेगाव शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले होते; मात्र नगर पंचायत झाल्यामुळे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली. २७ नोव्हेंबर, दुसर्या दिवशीसुद्धा अतिक्रमणावर गजराज चालला. किरकोळ वाद वगळता शांततेत अतिक्रमण हटविण्यात आले. शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून ते जुने बस स्टॅण्डवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. जुन्या बस स्टॅण्डवर अनेक दुकानदार यांनी आपल्या दुकानापुढे सिमेंटचे फ्लोरिंग, टिनशेड उभारुण अतिक्रमण केले होते. ते सर्व काढण्यात आल्याने रस्त्याची रुंदी वाढली. त्यानंतर गोयनका नगर येथून ते जुना पांगरी नवघरे रस्ता खुला करण्यात आला. अनेक वर्षांपासून फोफावलेले मालेगाव शहरातील अतिक्रमण नगर पंचायत प्रशासनाच्यावतिने काढण्यात येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांत समाधान व्यक्त केल्या जात आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कोणता वाद उद्भवू नये, याकरिता पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे. मालेगाव ग्रामपंचायतचे रुपांतर १७ जुलै रोजी नगर पंचायतमध्ये झाले. नगर पंचायत प्रशासकपदी तहसीलदार सोनाली मेटकरी या रुजू झाल्या. सूत्रे स्वीकारल्यानंतर मेटकरी यांनी थकीत कर वसुलीकडे लक्ष देऊन नगरपंचायतच्या तिजोरीत ५0 लाखाच्यावर महसूल गोळा केला. आता मालेगावला अतिक्रमणच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेतल्याने रस्ते मोकळे होण्यास सुरुवात झाली आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान तहसीलदार तथा प्रशासक सोनाली मेटकरी, उपजिल्हाधिकारी क्रांती ढोब, नायब तहसीलदार आर.बी. डाबेराव, ठाणेदार के. वाय. मिर्झा, तलाठी अमोल पांडे, विनोद घुगे पंडित घुगे डी.एन. केंद्रे यांच्यासह नगर पंचायत व महसूल कर्मचारी, पोलीस उपस्थित होते.
अतिक्रमणावर चालला गजराज
By admin | Published: November 28, 2015 2:46 AM