लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कारंजा शहरातील अनधिकृत असलेली धार्मिक स्थळे १० जुलै रोजी प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्तात काढण्यात आली. या मोहिमेंतर्गत शहरातील ऋषी तलावाच्या बाजुने असलेली काँग्रेस नगरमधील मदरसा, वाल्मीक नगरातील शितलामाता मंदिर व दुर्गा मंदिर तसेच मोची पुऱ्यातील समाज मंदिर व अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, ठाणेदार एम.एम.बोडखे, तहसीलदार सचिन पाटील, मुख्याधिकारी प्रमोद वानखडे, यांचेसह पालिका कर्मचारी व महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनातर्फे कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.