संतोष वानखडे वाशिम, दि. १४- वाशिम जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून चुकीच्या पद्धतीने सेवा ज्येष्ठता याद्या बनविणे, मर्जीतील कर्मचार्यांना पदोन्नती, नियमबाह्य नोकरीत सामावून घेणे आदी प्रकारांनी अमरावती विभागात वाशिमची जिल्हा परिषद प्रकाशझोतात येत आहे. यासंदर्भात आमदार लखन मलिक यांनी विभागीय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनुसार, वाशिम येथील या सगळ्या प्रकाराची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या समितीमार्फत चौकशी पुर्णत्वाकडे आली आहे.जि.प.सेवा ज्येष्ठता याद्या चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध होत आल्याने अनेक पात्र कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले तर अधिकार्यांच्या मर्जीतील कर्मचारी वरिष्ठ पदावर आपसुकच विराजमान झाल्याचा प्रकार समोर येत आहे. हातपंप दुरुस्ती पथकातील कर्मचार्यांना नोकरीत सामावून घेणे, अधिकार्यांची दिशाभूल करून व शासन निर्णयाला डावलून मानिव दिनांक मिळविणे, उच्च न्यायालयाचा निर्णय असतानाही अनुकंपा कर्मचार्यांवर कार्यवाही न करणे, पदोन्नतीमध्ये दिव्यांगांचे समांतर आरक्षण असताना आरक्षण दाखवून पदोन्नती करणे, सेवा ज्येष्ठता यादी सुधार समितीचे अहवाल प्राप्त न करताच पदोन्नती करणे, मागासवर्गीय कक्षाचे रोष्टर प्रमाणे पदोन्नती न करणे, काही कर्मचारी सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण नसतानाही पदोन्नती देणे आदी अनियमितता यापूर्वीच सामान्य प्रशासन विभागाकडून झाल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी वेळोवेळी केला. यासंदर्भात न्याय मिळण्याच्या मागणीसाठी यापूर्वी कर्मचारी उपोषणालाही बसले होते. तथापि, अद्यापही दखल घेतली नाही. यासंदर्भात आमदार लखन मलिक यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर चौकशीचे चक्रे फिरली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत झाली; मात्र या समितीतही ठपका असलेल्या काही कर्मचार्यांचा वावर असल्याने अन्यायग्रस्त कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कर्मचारी संघटनेच्या अंतर्गत कलहाची झालरही या सेवा ज्येष्ठता यादीच्या चुकीवर पांघरून घालण्यास पुरेशी ठरत असल्याची चर्चा आहे.सेवा ज्येष्ठता यादी संदर्भातील आक्षेपांची चौकशी पुर्णत्वाकडे आली आहे. लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला जाणार आहे.- के.एम. अहमदअतिरिक्त सीईओ, वाशिम
जि.प.च्या सेवा ज्येष्ठता यादीत गौडबंगाल!
By admin | Published: October 15, 2016 2:37 AM