शिखरचंद बागरेचा /वाशिम : शहर परिसरात अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहेत. वरली मटका, ताजी वरलीसह टेबल एक्का बादशहा, रमी, तीन पत्ते खेळल्या जात असल्याचे लोकमतने आज ५ जानेवारी रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले. जिल्हयात सुरू असलेल्या अवैध धंदयाबाबतच्या प्राप्त माहितीवरून लोकमतने स्टिंग ऑपरेशन राबविले. यामध्ये शहरानजिक असलेल्या परंतु ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणार्या काकडदाती व वाशिम शहरामध्ये अवैध धंदे सुरू असल्याचे उघडकीस आले. काकडदाती येथे आज दुपारी १ वाजताच्या दरम्यान लोकमतचे प्रतिनिधींचे सहकारी पोहचले असता येथे टेबल एक्का बादशहा, रमी, तीन पत्ते खेळल्या जात असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे हे खेळ सकाळी १0 वाजतापासून रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहत असल्याची माहितीही यावेळी प्राप्त झाली. वाशिम शहरामध्ये वरली व्यवसाय तेजीत असल्याचे गल्ली-बोळीत असलेल्या गर्दीवरून दिसून आले. या गर्दीच्या ठिकाणची पाहणी केली असता चक्क एकाच ठिकाणी ५ ते ६ जण वरलीचे पैसे घेतांना आढळून आल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून उघड झाले. यावर पोलिस अधिका-यांशी संपर्क साधला असता, अवैध धंदे करणार्यांवर लक्ष ठेवून जास्तीत जास्त कारवाई करण्याच्या सूचना सर्व ठाणेदारांना दिल्या असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी डी.एम. वाळके यांनी स्पष्ट केले.
वाशिमात बोकाळला जुगार
By admin | Published: January 06, 2015 12:45 AM