वाशिम - पोलीसांकडून अवैध जुगार खेळणारे व खेळविणारे यांचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अशा अवैध धंद्यावर आळा घालणे हे पोलीसांचे आद्यकर्तव्य ठरते. परंतू या कर्तव्याला ‘तिलांजली’ देत पोलीस कर्मचाऱ्यांनीच ‘जुगाराचा खेळ’ रंगविल्याप्रकरणी सहा कर्मचाऱ्यांना निलंबीत केल्याची माहिती पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली.
पोलीस खाते हे शिस्त असलेल्या लोकांचे खाते असून पोलीस खात्यातील शिस्तीचा दर्जा हा इतर खात्यातील शिस्तीपेक्षा उच्च आहे. त्यामुळे पोलीस खात्यामध्ये शिस्तीला खुप महत्वाचे स्थान आहे. पोलीसांकडून अवैध जुगार खेळणारे व खेळवणारे यांचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अशा अवैध धंद्यावर आळा घालणे हे पोलीसांचे आद्यकर्तव्यच ठरते. मात्र या कर्तव्यालाच ‘वेशीवर टांगुन’ पोलीस कर्मचाऱ्यांनी दस्तुरखुद्द पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आवारातच जुगाराचा खेळ रंगविल्याची ‘लाजिरवाणी’ बाब २८ मार्च रोजी उघडकीस आली. पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात असलेल्या क्युआरटी / आरसीपी हॉल मध्ये सुरू असलेल्या जुगाराच्या डावावर छापा टाकला. या छाप्यामध्ये उमेश पांडुरंग कांबळे (मोटर वाहन विभाग), मधुकर नामदेव पोहरे (शहर पोलीस स्टेशन, वाशिम), अमोल ज्ञानेश्वर शेळके (मोटर परिवहन विभाग), अनिल देवराव हटकर (पोलीस मुख्यालय) व नागोराव भगवानराव खंडके (ग्रामीण पोलीस स्टेशन,वाशिम) हे पाच कर्मचारी व आणखी एक कर्मचारी (सद्या नाव उपलब्ध नाही) जुगार खेळताना आढळून आले. या सहा कर्मचाऱ्यांना पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी चौकशीचे आधीन राहून मुंबई पोलीस शिक्षा आणि अपिले १९५६ च्या नियम ३ चे पोट नियम (१) मधील (आ-२) च्या तरतुदीनुसार त्वरीत प्रभावाने निलंबीत करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.