लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या घोषणेसह ढोलताशांच्या गजरात सोमवार, २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात गणरायांचे जल्लोषात स्वागत झाले. सार्वजनिक गणेश मंडळांकडून ‘बाप्पां’ची हर्षोल्हासात स्थापना केली. मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतिक असणाºया गणरायांचे सोमवारी आगमन होताच गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, जागोजागी वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यांवरचे लहान-मोठे खड्डे चुकवत गणराय घरोघरी पोहोचले. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी मोठ्या संख्येने श्रींची स्थापना करण्यात आली. सकाळच्या सत्रात घरगुती गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी वाशिम शहरातील नगर परिषद चौक मार्ग, पाटणी चौक आदी ठिकाणी भाविकांची एकच झुंबड उडाली होती. पूजेचे साहित्य आणि गणेशमूर्तीसह मोरयाचा गजर झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नगर परिषद चौक या दरम्यान एका मंगल कार्यालयाजवळचा रस्ता पोलिसांनी दुचाकी वाहनांसाठी बंद ठेवला होता. गणरायांसमोर आरास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य खरेदीसाठी भाविकांनी स्थानिक पाटणी चौकस्थित बाजारात एकच गर्दी केली. दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीद्वारे मूर्तीची प्रतिष्ठापना केली. गणेशोत्सवादरम्यान शांतता राखावी यासाठी पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. वाशिमप्रमाणेच रिसोड, कारंजा, मानोरा, मालेगाव, मंगरूळपीर व ग्रामीण भागात ढोलताशांचा निनाद व मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात सर्वत्र बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यासाठी भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. लाडक्या गणरायांच्या स्वागतासाठी घरातील आबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतले होते.
वाशिम जिल्ह्यात गणरायांचे जल्लोषात स्वागत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 2:54 PM