कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने गणेश मूर्ती महागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 03:17 PM2018-09-06T15:17:16+5:302018-09-06T15:21:58+5:30
कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’च्या (पीओपी) गणेश मूर्ती महागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
- नंदकिशोर नारे
वाशिम - कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’च्या (पीओपी) गणेश मूर्ती महागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासंदर्भात मूर्तिकारांशी संपर्क साधला असता त्यांनीही यास दुजोरा दिला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध सामाजिक संघटना, शाळांच्यावतीने शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात येत असून याकडे नागरिकांचा ओढा वाढलेला दिसून येत आहे. कच्च्या मालाच्या किमती, मजुरी आणि इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ आदी कारणांमुळे गणेशमूर्तीच्या निर्मितीखर्चात यंदा वाढ झाल्याने त्याचा परिणाम मूर्तीच्या दरांवर जाणवणार आहे.
तसेच या कच्च्या मालाच्या भाववाढीमुळे अनेक मूर्तिकारांनी यावर्षी मूर्ती तयारच न करण्याचे ठरविल्याने बाजारात दुकाने कमी लागणार. यावेळी मुर्त्या कमी व खरेदीदार जास्त राहतील , यामुळेही मूर्तींचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. मूर्ती बनवण्यासाठी लागणारी माती (‘प्लास्टर आॅफ पॅरिस’) हे राजस्थानहून आणण्यात येते. गतवर्षी या पीओपीचे भाव १५० रुपयांमध्ये २५ किलो म्हणजेच ६ रुपये किलो. सद्यस्थितीत हेच भाव १९५ रुपयात मिळत आहे म्हणजेच यामध्ये जवळपास दोन रुपये किेलो तसेच बँगवर १०० रुपयाची वाढ दिसून येत आहे. तसेच मूर्तींना देण्यात येत असलेल्या रंगाच्या भावामध्येही मोठया प्रमाणात वाढ झाली असून आधी २१०० रुपयांमध्ये मिळणार रंगाची किंमत ३१०० रुपये झाली.
पीओपीच्या मूर्ती बनविण्यासाठी साच्यांचा वापर केला जातो. हे साचे सर्वच मूर्तिकार विकत घेऊ शकत नाहीत. हे भाड्याने सुद्धा उपलब्ध होत असल्याने अनेक मूर्तिकार भाड्यानेच घेणे पसंत करतात. परंतु या साच्यांच्या भाड्यामध्येही वाढ झाली असून यावर्षी ३ हजार रुपये दिवसाप्रमाणे मूर्तिकारांना भाडे मोजावे लागत आहे. या खर्चात वाढ झाल्याने मूर्तींच्या दरातही यावर्षी निश्चितच वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गणेशमूर्तीसाठी कच्चा माल येतो राजस्थानहून
गणेशमूतीसाठी लागणारा कच्चा माल हा प्रामुख्याने राजस्थानमधून आणला जातो. यात काथ्या, प्लास्टर आॅफ पॅरिस, शाडूची माती, रंग यासारख्या घटकांचा समावेश असतो. वाहतूक खर्च वाढल्याने रंग, शाडूची माती, पीओपी आदीच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव वधारले आहेत. तसेच रंगाचे भाव वाढले आहेत, असे मूर्तिकार पेंढारकर यांनी सांगितले. या सगळ्याचा परिणाम किंमतीवर झाला आहे.
शाडुच्या मातीपासून मूर्ती बनवण्याची कार्यशाळा
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीमुळे जलचर आणि पर्यावरणावर होणा-या दुष्परिणामावर आळा घालण्यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मूर्ती निर्मितीबाबत विविध सामाजिक संघटना, महाविद्यालय, शाळांमध्ये कार्यशाळा आयोजित करुन शाडूच्या मातीपासून मूर्तींचे प्रशिक्षण दिल्या जात आहे. याचा शेकडो भाविक लाभ घेत असून अनेकांनी मूर्तीही बनवल्या आहेत.
मूर्ती बनवताना लागणा-या साहित्याच्या भावात वाढ झाल्याने यावर्षी भाविकांना मूर्तींचे दर जास्त मोजावे लागणार आहेत. गतवर्षी १०० रुपयांपासून श्रींच्या आकर्षक मूर्ती मिळाल्यात यावर्षी यामध्ये दुपटीने वाढ होण्याची चिन्हे आहेत.- राम निरदोडे
मूर्तिकार, वाशिम