वाशिम : दरवर्षी प्रमाणे यंदाही कारंजा येथील गणेशभक्तांनी कारंजा-मानोरा मार्गावरील अडाण नदीत गणेश विसर्जन करून बाप्पांना भावूर्पण निरोप दिला. या सोहळ्यादरम्यान अनुचित घटना घडू नये म्हणून क्रेनच्या आधारे मोठ्या गणेश मूर्तीचे विसर्जन सुरक्षीतरित्या करण्यात आले. यासाठी सर्वधर्म आपत्कालीन संस्थेच्या (सांस) स्वयंसेवकांनी सेवा दिली. कारंजा येथील सार्वजनिक गणेश मंडळांकडून यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
शुक्रवारी शहरातील अनेक गणेश मंडळांनी कारंजा-मानोरा मार्गावरील अडाण नदीच्या पुलावर श्रींची मूर्ती वाजतगाजत नेऊन विसर्जन सोहळा पार पाडला. या विसर्जन सोहळ्यादरम्यान अपघात घडू नये यासाठी पोलिस, नगर पालिका आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने सांसच्या पथकाने क्रेनच्या आधारे श्रींचे सुरक्षीत विसर्जन करण्यात महत्त्वाची भूमिका पार पडली. यात संस्थेचे संस्थापक श्याम सवाई यांच्या मार्गदर्शनात स्वयंसेवकांनी चोख कामगिरी बजावली. स्वयंसेवकांनी नदीपात्रात नावेत बसून क्रेनने खाली सोडण्यात आलेल्या श्रींच्या मूर्तींचे बेल्ट सोडून स्वयंसेवकांनी नदीपात्रात सुरक्षीत विसर्जन केले. अनोखा विसर्जन साेहळा अनुभवण्यासाठी अडाण नदीच्या पुलावर अनेक गणेश भाविकांनी उपस्थिती लावली होती.