लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : मोठा गाजावाजा करून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मालेगाव शहरात घंटागाड्या फिरत आहे. तरीही अनेक व्यवसायिक आपल्या दुकानातील व दुकानासमोरील कचरा रस्त्यावर आणून टाकतात तसेच रस्त्यावरच हा कचरा जाळून टाकला जात आहे. यामुळे मालेगाव शहरात घंटागाड्या आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.मालेगाव नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर तब्बल अडीच ते तीन वर्षांनी मालेगावात घंटागाड्या सुरू झाल्या आणि प्रत्येक प्रभागात जाऊन त्या घंटागाड्या कचरा जमा करत आहेत. त्यामुळे जागोजागी कचरा तयार होण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. प्रभागातील गृहिणी तसेच प्रत्येक प्रभागातील नागरिक या घंटागाडीत नित्यनेमाने कचरा टाकत आहेत. मात्र जुन्या बस स्थानकावरील अनेक व्यावसायिक तसेच मुख्य रस्त्यावरील जोगदंड हॉस्पिटल ते शिव चौक येथील व्यवसाययिक आपला कचरा तसेच दुकान झाडल्यानंतरचा कचरा सुद्धा रस्त्यावर आणून टाकत आहेत. शहरात कचरा गाड्या फिरून कचरा जमा करत आहेत तर मग व्यवसायिक लोक आपल्या दुकानातील कचरा रस्त्यावर का टाकतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जागोजागी असलेले कचºयाचे ढीग पाहून ‘सोनू तुला कचरा गाडीवर भरोसा नाही काय’ असे एका गीतातून उपहासात्मक बोलल्या जात आहे. नगर पंचायत प्रशासनाने कचरा रस्त्यावर टाकणाºयाला तंबी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कचरा रस्त्यावर टाकल्यामुळे सर्वत्र घाण आणि दुर्गंधी पसरत आहे तर काही वेळा कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे धूर निघतो. हा प्रकार बंद होणे आवश्यक ठरत आहे.