लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात मागील काही दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे गावातील युवकांनी शनिवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला गांधीगिरी करून हार घातला.मालेगाव तालुक्यात सर्वांत मोठे आरोग्य केंद्र म्हणून शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्राची ओळख आहे.या आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या नागरिकांची संख्या लक्षात घेता येथे किमान दोन वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र सध्या स्थितीत काही महिन्यांपासून एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. आता ते सुद्धा मागील काही दिवसांपासून आरोग्यवर्धिनी केंद्रात हजर नाहीत. परिणामी रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे गावातील संदीप देशमुख, रोहित देशमुख, अंकुश देशमुख, सुमित देशमुख, संतोष अंभोरे यांनी आरोग्यवर्धिनी केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी व्यक्त केली.
शिरपूर येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वडील आजारी झाल्याने ते वडिलांच्या उपचारासाठी रजेवर गेले. दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. मात्र तेही आजारी झाले. सोमवारपर्यंत नवीन आरोग्य अधिकारी देण्यात येईल. -डॉ. श्याम गाभणे, अध्यक्ष जि.प.वाशिम
जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. शिरपूर येथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वडिलांची प्रकृती अचानकपणे अस्वस्थ झाल्याने ते उपचारासाठी वडिलांना घेऊन औरंगाबाद येथे दवाखान्यात गेले आहेत. शिरपूर आरोग्यवर्धनी केंद्रात पर्यायी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. -डॉ. संतोष बोरसे, तालुका आरोग्य अधिकारी मालेगाव.