वाशिम: दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाेकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे हाेणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने उज्ज्वला याेजनेंतर्गंत गॅसचे वितरण केले. मात्र, गत काही महिन्यात गॅसचे भाव गगनाला भिडल्याने तसेच सबसिडीही जवळपास बंदच झाल्याने उज्ज्वला याेजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत आहेत. यामुळे सर्वांचेच ‘बजेट’ कोलमडत आहे. यात पगारदार, व्यावसायिकही चिंतेत असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना वनवन भटकंती करीत सरपण जमा करावे लागते व धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागते. महिलांचे हे हाल थांबून व वनांचेही रक्षण होण्यासह पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, या हेतूने केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला याेजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. मात्र, दरात हाेत असलेली वाढ लाभार्थींसाठी डोकेदुखी ठरत आहे.
------------------------------
बॉक्स:
सिलिंडरचे दर गरिबांच्या आवाक्याबाहेर
उज्ज्वला याेजनेंतर्गंत गॅस कनेक्शन माेफत मिळाले. काही महिने सबसिडीही मिळाली. आता दरवाढ झाल्यानंतर सबसिडी मिळत नसल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी जानेवारी २०२० मध्ये ६२५.०० रुपयांवर असलेले सिलिंडरचे दर जुलै २०२० पर्यंत कमी होत जाऊन ६३०.०० रुपयांवर आले होते.
जानेवारी २०२१ मध्ये हे दर ६८०.०० रुपयांवर पोहचले, त्यानंतर या महिन्यात पुन्हा भाववाढ होऊन फेब्रुवारी २०२१ मध्ये सिलिंडरचे दर ७८९. ०० रुपयांवर पोहचले आहेत. त्यात सबसिडी ४ ते ५ रूपयेच मिळत असल्याने गरिबांना हे परवडणारे नाही.
___________
कोट
आधी रोज मजुरी काम असायचं त्यावेळेस गॅसचे दाम कमी असायची. त्यामुळे गॅस भरणे कठीण नव्हते. आता मात्र मजुरीही नाही व गॅसचे दरही वाढल्याने पुन्हा चूलच पेटवावी लागत आहे
- नीलिमा पुंडलिक सलामे
गृहिणी इंझोरी
________________
कोट:
ग्रामीण भागातील मजुरी करणाऱ्या महिलांच्या नशीबात चुलीचा धूरच लिहिला असून, वाढत्या गॅसच्या किमतीमुळे आम्ही पुन्हा चुली पेटवून सर्वमंगला करीत आहोत
-कविता नागोलकार,
गृहिणी, इंझोरी
________________
कोट:
गत काही महिन्यांपासून महागाई माेठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वच वस्तुंचे भाव वाढत असताना गॅस सिलिंडरचे भावही वाढले आहे. दरररोज वाढत जाणारी महागाई चिंतेची ठरत आहे. घरातील खर्च भागविताना नाकीनऊ येत आहे. त्यात आता गॅस सिलिंडरचे दरही वाढत असल्याने गॅस वापरणे शक्य नसल्याने चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे.
-चंद्रकला काळेकर,
गृहिणी, इंझोरी
______________________
कोट:
शासनाकडून उज्ज्वला याेजनेंतर्गंत गॅस मिळाल्याने खूप आनंद झाला होता. मात्र, सिलिंडर खूप महाग झाल्याने आता तोंडचे पाणी पळाले आहे. महागडा गॅस वापरणे परवडत नाही. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. शासनाने गॅसवरील सबसिडी वाढवण्याची गरज आहे.
- रुख्मिणा सखाराम काळे,
गृहिणी, मंगरुळपीर
__________________
कोट-
महिनाभरात गॅस सिलिंडरच्या दरात १०० रूपये वाढ झाली आहे. आधीच रोजगार मिळणे कठीण असताना सिलिंडरचा खर्च कसा करावा, हा प्रश्न आहे. त्यामुळे जंगलात फिरून सरपण आणत आम्ही चुलीवर स्वयंपाक करीत आहोत.
-सीताबाई शिरसाट,
गृहिणी, मंगरुळपीर
__________
सिलिंडरचे दर
महिना. दर
जानेवारी-२०२० ६२५.००
जुलै-२०२० ६३०.००
जानेवारी-२०२१ ६८०.००
फेब्रुवारी-२०२१. ७८९.००