कारंजालाड : शहराच्या वैभवशाली परंपरेची साक्ष देणार्या चारही वेशींची दुरवस्था आजस्थितीतही कायमच आहे. कारंजा शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहरातील मंगरूळ, पोहा, दारव्हा व दिल्ली या चार वेस आणि इतरही प्राचीन वास्तू याची साक्ष देत आहेत. कालांतराने या वास्तूंची देखभाल व्यवस्थितरित्या घेण्यात न आल्याने ऐतिहासिक वैभव इतिहासजमा होण्याची भिती व्यक्त होत होती. याबाबत आमदार प्रकाश डहाके यांनी पुरातत्व विभाग व वरिष्ठांकडे वेशींच्या देखभालीबाबत तसेच संरक्षिक स्मारकाचा दर्जा मिळण्याबाबत पाठपुरावा केला होता. याची दखल घेत मार्च २0१३ या महिन्यात पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांनी चारही वेशींची पाहणी केली तसेच ४ मार्च २0१३ रोजी प्राथमिक अधिसूचना जारी केली होती. चार वेशीवर अंदाजे ४ कोटी रुपये खर्च येईल असे मत पूरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.मधूकर गणणे यांनी व्यक्त केले होते. चार कोटी रुपयांचा निधी चारही वेशींना उजाळा देईल, असा विश्वास शहरवासी व्यक्त करीत आहेत. या वेशींची दुरूस्ती करून देखभाल नियमित ठेवल्यास पर्यटकदेखील कारंजाकडे आकर्षित होतील, असा कारंजेकरांना विश्वास आहे. पण एक वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ उलटून गेल्यावरही वेशींच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात झाली नाही. निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात कार्यवाही सुरूवात होत नसल्याने नागरिक संभ्रमावस्थेत आहेत.
वेशींची दुरवस्था कायमच
By admin | Published: June 16, 2014 12:26 AM