वाशिम : गावराण आंब्यांची चवच निराळी अशी म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे. गावरानी आंबाच बाजारात येत नसल्याने नागरिक दसेरी, लंगडा, केसर आंब्यावर आपली रसावळी भागविताना दिसून येत आहेत. काही बोटावर मोजण्याइतपत शेतकरी सकाळच्यावेळी गावरानी आंबा विक्रीस आणतात ते खाली टोपली ठेवण्याआधिच त्याचा भाव ठरवून नागरिक ते घेवून जात येत असतांना दिसू येत आहेत.
फळांचा राजा म्हणून ओळखल जाणाऱ्या आंब्याच्या अनेक जाती आहेत. यामध्ये बैगनपल्ली, दसेरी, केसर, पायरी, हापूस, लंगडा, भागमभाग, तोतापुरी (कलमी), नीलम, गोवा मानकूर, रत्ना, मल्लिका, आम्रपाली, सुवर्णरेखा, मालगीज, मालगोबा, नागीण, भोपळी आणि बोरशा यांचा प्रामुख्याने समावेश आहे; परंतु या सर्व आंब्यापेक्षा विदर्भातील गावराण आंब्यांची गोडी सर्वांनाच भुरळ घालणार आहे. अलिकडच्या काळात गावराण आंबे वृक्षतोडीमुळे मिळेनासे झाली असले तरी, या आंब्यांना आजही मोठी मागणी आहे. सद्यस्थितीत आंब्याचा हंगाम जोरात सुरुआहे. विविध ठिकाणच्या बाजारात अनेक विक्रेते आंब्याची दुकाने थाटून बसल्याचे दिसतात. तथापि, गावराण आंब्याची दुकाने मात्र मोजकीच असल्याने गावराण आंंब्याच्या खरेदीसाठी लोक आतूर असल्याचे दिसते. मात्र , दिवसेंदिवस प्रमाण घटत असल्याने गावरान आंबा दिसेनासा झाला आहे. तरी ग्रामीण भागात मात्र काही प्रमाणात आजही गावरान आंबा मिळत आहे.
वाशिम शहरामध्ये उत्तप्रदेशातून आणलेल्या दशहरी, लंगडा, केसर या आंब्याची मोठया प्रमाणात विक्री होत असल्याचे चित्र दिसत आहे. गावराणी आंबा बाजारात विक्रीला येतच नसल्याने उत्तरप्रदेशातील दशहरी, लंगडा केसर बदाम या आंब्याला ग्राहकांकडून मोठी मागणी होताना दिसून येत आहे. उत्तरप्रदेशातील हे आंबे फेब्रुवारी पासूनच कृतीम पद्धतीने पिकवून बाजारात विकली जात आहेत. तर गावराण आंबा हा एप्रिल मध्ये पिकतो परंतु यावर्षी गारपिट, वारा वादळ, पाण्याने संपूर्ण गावरान आंबा नाहिसा झाला आहे. यामुळे दशहरी, लंगडा, केसर, बदाम या आंब्याच्या मागणीत वाढ झालेली दिसून येत आहे.
कारपेटमध्ये पिकविलेला आंबा आरोग्यासाठी घातक
आंबे पिकविण्याासठी कॅल्शियम कार्बाईड (कारपेट) वापरल्या जात असल्याने यापासून पिकविलेले आंबे नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहेत. बाजारात विविध जातीचे आंबे मोठया प्रामणात विक्रीस आले आहेत. ही आंबे लवकरात लवकर पिक विण्यासाठी कारपेटसह ईतर घातक पावडरचा वापर करुन ती पिकवली जात आहे. या पावडरचा शरीरावर मोठा परिणाम होत असतांना आंबेविक्रेते याचा थोडाफार विचार न करता आपला व्यवसाय करण्यात मश्गुल आहेत. कारपेटचा वापर करता येत नसतांना आंबेविक्रेते ते सर्रास करतांना दिसून येतात. याकडे संबधितांनी लक्ष देवून त्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे.
ग्रामीण भागात गावरानी आंब्यालाच पसंती
मंगरुळपीर , शेलुबाजार, शिरपूर परसिरात गावरान आंबा बसस्थानक परिसरात दररोज सकाळी ७ ते १० या काळात विक्रीसाठी आणल्या जात आहे . या काळात परप्रांतीय आब्याला दुकानाकडे कुणी पाहतही नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गावराणी आंबा परप्रांतीय आंब्यावर ग्रामीण भागात भारीच असल्याचे चित्र आहे.