वाशिम : फेरीवाल्यांसाठी सुरू केलेल्या पीएम स्वनिधी योजनेंतर्गत जिल्ह्यात २,६७० जणांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे; मात्र राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून केवळ ९०० जणांना कर्ज मंजूर झाले आहे. उर्वरित फेरीवाल्यांच्या कर्जासाठी बँकेत फेऱ्या सुरू असतानाही प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. त्यामुळे बँकांनी फेरीवाल्यांची कर्ज प्रकरणे तातडीने निकाली काढावी, अशा सूचना अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांनी केली आहे.
शासनाने जुलै २०२० मध्ये फेरीवाल्यांसाठी ‘पीएम स्वनिधी योजना’ अंमलात आणली. या अंतर्गत १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर केले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील २,६७० फेरीवाल्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात मात्र ९०० जणांनाच कर्ज देण्यात आले असून, अन्य लाभार्थी यापासून वंचित आहेत. बँकांनी पात्र ठरलेली कर्ज प्रकरणे विनासायास निकाली काढावी, अशी सूचना निनावकर यांनी केली आहे.