या वेळी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची उपस्थिती होती. हिंगे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून सध्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील दीर्घ आजार असणाऱ्या व्यक्ती व ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येत आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, कारंजा उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयासह वाशिम शहरातील सात खाजगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. ७० पेक्षा अधिक आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांवरही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३० हजारपेक्षा अधिक व्यक्तींनी लस घेतली असून, कोणालाही गंभीर स्वरूपाचा दुष्परिणाम दिसून आला नाही. लस घेतल्यावर सौम्य ताप अथवा अंगदुखी यांसारखी लक्षणे जाणवू शकतात, मात्र त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. एका दिवसात हा ताप आणि अंगदुखी कमी होते, असे त्यांनी सांगितले.
.................
अफवांवर विश्वास ठेवू नका : डॉ. शिंदे
कोरोना प्रतिबंधक लसीविषयी समाज माध्यमातून वेगेवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यावर विश्वास ठेवू नये. या लसीमध्ये प्राण्यांच्या शरीरातील घटक असल्याची अफवा पसरविली जात असून, ती पूर्णतः चुकीची आहे. देशात दिल्या जात असलेल्या दोन्ही लसींमध्ये कोणत्याही प्राण्याचा अथवा पक्ष्याच्या अवयवाचा समावेश नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता सर्व जाती, धर्मातील व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद शिंदे यांनी केले.