वाशिम : महिला सक्षमीकरण प्रशिक्षणअंतर्गत गुरुमाऊली बहुउद्देशीय संस्था व इलाईट बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत स्थानिक श्री बालाजी मंदिर परिसरातील व शेलू रस्त्यावरील झोपड्यांमध्ये राहणार्या गोरगरीब व गरजू मुला-मुलींना छत्री व फळांचे वाटप करण्यात आले. अचानक मिळालेल्या या भेटीमुळे या मुला-मुलींच्या चेहर्यावर हास्य उमटले.
यावेळी महिला पोलीस कर्मचारी संगीता ढोले, गुरुमाऊली संस्थेच्या अध्यक्षा सोनाली गावंडे, इलाईट संस्थेच्या अध्यक्षा सोनल विशाल डुकरे यांच्यासह वर्षा गंगाळे, प्रिया इंगोले, ज्योती तिरके, रूपा भंडारी, विद्द्या निकम आदी महिलांच्याहस्ते या मुला-मुलींना छत्र्या आणि फळे देण्यात आली.
संगीता ढोले या शासकीय कर्तव्य पार पाडीत, शेलु फाटा परिसरातील गोरगरीब मुला-मुलींना शिक्षणाचे धडे देत आहेत. या मुला-मुलींना सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना आपापल्या परीने मदत करीत आहेत.
गुरुमाऊली बहुउद्देशीय संस्था व इलाईट बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत गरजू मुला-मुलींना छत्री व फळांचे वाटप करण्यात आले. सोनाली गावंडे व सोनल डुकरे यांनी यावेळी विचार व्यक्त केले.
०००००
मदतीसाठी पुढे यावे
आजुबाजूला अनेक निराधार आणि गोरगरीब कुटुंबे राहतात. या कुटुंबांना आपल्यापरीने जमेल ती मदत करून त्यांना मायेची ऊब देणे गरजेचे आहे. एक दुसर्यांना मदत करण्याच्या भावनेतून सामाजिक संवेदना कायम राहते. राष्ट्राची एकजूट आणि विकासाला आणखी गती मिळते. यासाठी प्रत्येकाने आपल्यापेक्षा गरीब असलेल्या कुुटुंबातील मुला-मुलींना जमेल ती मदत करून राष्ट्राच्या या भावी पिढीला वाचविण्याची आवश्यकता आहे. गरजूंना मदत करण्यासाठी दानशूरांनी पुढे येण्याची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.