मंगरूळपीर : येथील रहिवासी तथा नागपूर येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत किलोसिंग उर्फ गजेंद्रसिंह ठाकूर यांचा २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनानिमित्त झेंडावंदन करण्यासाठी जात असताना अपघातात मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्यावर आज मंगरूळपीर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची मोठी मुलगी डॉ. नेहा ठाकूर हिने मुंडन करून पित्याला मुखाग्नी दिला.
अपघातात मृत्यू झाल्यानंतर गजेंद्रसिंह ठाकूर यांचे पार्थिव २७ जानेवारी रोजी मंगरूळपीर येथे आणण्यात आले. यावेळी सीआयएसएफचा संपूर्ण ताफा सोबत होता. बिरबलनाथ मंदिरासमोर जयस्तंभ चौकातून जाताना मंगरूळपीर पोलीसांकडूनही शोकशस्त्र मानवंदना देण्यात आली. शहरातील नागरिकांनी ठाकूर यांचे पार्थिव शरीर अंत्यविधीतसाठी जात असताना भारत माता की जय, अशा घोषणा दिल्या. मंगरूळपीर येथील स्मशानभुमीत पार्थिव अंत्यविधीला आल्यानंतर त्यांची मोठी मुलगी डॉ. नेहा ठाकूर हिने मुंडन करून मुखाग्नी दिला. या योगे मुलापेक्षा कमी नसल्याचे तीने दाखवून दिले. यावेळी राष्ट्रगीत गाऊन गजेंद्रसिंह ठाकूर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.