लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : येथून जवळच असलेल्या शिरसाळा शेतशिवारात सोयाबीन सोंगणीसाठी आलेल्या गर्भवती महिलेने शेतातच कन्येला जन्म दिल्याची घटना ५ आॅक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. हा प्रकार उपस्थितांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगताच, चमूने घटनास्थळ गाठून माता व बाळावर उपचार केले. दोघांचीही प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले.सध्या शिरपूर परिसरात सोयाबीनचा हंगाम जोरात सुरू आहे. सोयाबीन काढणीला आल्यामुळे जिल्ह्यातील विविध भागासह राज्यातील विविध ठिकाणाहून शेतमजूर शिरपूर परिसरात आलेले आहेत. त्याचप्रमाणे शेंदुरजना आढाव तालुका मंगरूळपिर येथील काही शेतमजूर शिरसाळा येथे सुद्धा आले आहेत. या मजुरांमध्ये महिलांचाही समावेश असून, त्यापैकी पल्लवी नामक महिला शेतमजूर ही गर्भवती होती. सोमवारी सोयाबीन सोंगणी करताना दुपारी १ वाजताच्या सुमारास प्रसवकळा आल्याने, काही महिलांनी शेतातच एका ठिकाणी तिची प्रसुती केली. तिने गोंडस कन्येला जन्म दिला असून, ही घटना माहिती होताच उपस्थित शेतमजुरांनी दत्तराव इंगोले यांच्या गोठ्यामध्ये या महिलेला आश्रय दिला. माता व बाळ या दोघांचीही प्रकृती ठणठणीत आहे.