दापुरा : सन २०१७ मध्ये भाजप सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत २००१ ते २०१६ पर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती; परंतु यामध्ये इंझोरी सर्कलमधील बरेच शेतकरी सदर कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी शिवसेना इंझोरी सर्कल प्रमुख बाळू राठोड यांनी उपविभागीय अधिकारी कारंजा यांच्याकडे ३० सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली होती; पण त्याची दखल न घेण्यात आल्याने त्यांनी पुन्हा ०९ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
सदर निवेदनात वंचित शेतकऱ्यांना १५ दिवसांत न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कर्जमाफीचा लाभ घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे शासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी आठ ते दहा तास रांगेत उभे राहून कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज सादर केला; परंतु तरीसुद्धा इंझोरी सर्कलमधील बरेच शेतकरी आजही कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत, त्यामुळे सदर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ न्याय द्यावा, अशी मागणी राठोड यांनी कारंजा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ०९ फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे केली आहे.